जयपूर : हुंडा न दिल्यामुळे विवाहितेच्या शरीरावर शिव्या गोंदवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवरमधील रैणीमध्ये हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे.

 
पीडित तरुणीच्या पित्याने हुंड्यात 51 हजार रुपये न दिल्यामुळे सासरच्या मंडळीनी तिच्या शरीरभर शिव्या गोंदवल्या. त्याचप्रमाणे तिच्या कपाळावर 'मेरा बाप चोर है' असं गोंदवल्याचीही माहिती आहे. महिन्याभरापूर्वी तिला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं. तिला बेशुद्ध करुन शरीरावर शिव्या गोंदवल्याचा आरोप आहे.

 
विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी गोंदवलेला मजकूर मिटवण्याचा आतोनात प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 
अलवरमधील राजगडमध्ये राहणाऱ्या जग्गू नामक युवकाशी 14 जानेवारी 2015 रोजी तरुणीचा विवाह झाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिला हुंड्यासाठी त्रास देण्यात येत होता, असंही त्यांनी म्हटलंय.