मुंबई : जम्मू काश्मीरचा अफगाणिस्तान होताना आम्हाला पाहायचं नाही, अशी जम्मू-काश्मीरच्या जनतेची भावना असल्याचं तेथील दौऱ्यावर गेलेल्या युरोपियन युनियनच्या खासदारांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या जनतेला शांती आणि विकास हवा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आम्ही तेथील परिस्थितीची पाहणी केली. काश्मीरच्या जनतेला भेटून त्यांच्या भावना जाणून घेणे आमचं उद्दिष्ट होतं.
युरोपियन युनियनच्या खासदारांनी म्हटलं की, तथ्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही विविध देशांमध्ये जातो. जम्मू काश्मीरचा दौरा भारत सरकारने आयोजित केला होता. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती आम्ही घेतली. काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेधही खासदारांनी केला. दहशतवाद केवळ भारताची समस्या नाही तर, आमच्या देशातही दहशतवादाची समस्या आहे. जगभरातील देश दहशतवादाचा सामना करत आहेत. मात्र दहशतवाद कोणत्याही देशाला उद्ध्वस्त करु शकत नाही. दहशतवादाविरोधी कारवाईत आम्ही भारतासोबत आहोत, असंही युरोपियन युनियनच्या खासदारांनी सांगितलं.
काश्मीरमध्ये सामन्य नागरिक आणि भारतीय जवानांशी युरोपियन युनियनच्या खासदारांनी बातचित केली. दहशतवादाविरोधात तुम्ही कशाप्रकारे लढा देता असंही खासदारांनी त्यांना विचारलं. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना तेथे शांती हवी आहे. सर्व सुख-सोई मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा तेथील नागरिकांची आहे, असं या खासदारांनी म्हटलं.
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. केंद्रातून काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी पाठवला जातो. मात्र तो पैसा लोकांपर्यंत विकासकामातून पोहचत नाही, ही मोठी समस्या असल्याचा युरोपियन युनियनच्या खासदारांनी सांगितलं. भारतातील सध्याच्या राजकारणाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. येथील राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही, असं या खासदारांनी स्पष्ट केलं.