श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा प्रयत्न आणि युरोपियन युनियन शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतर खवळलेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री पाच मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. सगळे मजूर पश्चिम बंगालचे आहेत. दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधारात हा नरसंहार केला. सगळ्या मजुरांना रांगेत उभं करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी सातत्याने बिगर-काश्मिरी लोकांना लक्ष्य करत आहेत.
ही घटना मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कठरासू गावात झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी गावाजवळ असलेल्या मजुरांच्या वस्तीत गेले आणि त्यांना सोबत येण्यास सांगितलं. त्यांनी सगळ्या मजुरांना एका रांगेत उभं केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. सगळे मृत झाल्याचं समजल्यानंतर अतिरेक्यांनी तिथून पळ काढला. पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला कसंतरी वाचवण्यात आलं.
सर्व मजूर पश्चिम बंगालचे
रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, शेख मुरसलीन, कमरुद्दीन, मोहम्मद रफीक, निजामुद्दीन आणि रफीक-उल शेख अशी मृतांची नावं आहेत. गंभीर जखमी असलेल्या जहूरुद्दीनला श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सगळे मजूर पश्चिम बंगालचे रहिवासी होते.
बिगर-काश्मिरींवर पाचवा हल्ला
बिगर काश्मिरींवरील हा पाचवा हल्ला आहे. 14 ऑक्टोबरपासून आतापर्यंच 3 ट्रक चालक, एक सफरचंद व्यापारी आणि एका मजुराची हत्या झाली आहे. हे सर्व काश्मीरबाहेरचे होते. आता 5 मजुराच्या निर्घृण हत्यामुळे काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या परप्रांतियांमध्ये दहशत पसरवण्याचं काम केलं आहे.
370 रद्द झाल्यानंतर परप्रांतियांवरील दहशतवादी हल्ल्यात वाढ
दहशतवाद्यांनी 24 ऑक्टोबर रोजी शोपियांमध्ये दोन ट्रक चालकांची गोळी झाडून हत्या केली होती. तर 14 ऑक्टोबरला राजस्थानच्या एक चालकाची दक्षिण काश्मीरमध्ये हत्या केली. याशिवाय 16 ऑक्टोबरला वीट भट्टीवर काम करणारा छत्तीसगडचा एक मजूर आणि पंजाबमधील एका सफरचंद व्यापाऱ्याचा खून केला होता. कलम 370 आणि 35A रद्द झाल्यानंतर युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, त्याचवेळी अतिरेक्यांनी मंगळवारी रात्री हे निर्घृण कृत्य केलं.
कलम 370 रद्द झाल्यानंतर मोठा हल्ला, कुलगाममध्ये 5 बिगर काश्मिरी मजुरांची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2019 10:33 AM (IST)
काश्मीरच्या कुलगाममध्ये पाच मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली. हे सर्व मजूर पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निषेधार्थ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -