नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक संपली आहे. संसद भवनात दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. "या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, राजकीय परिस्थितीवर नाही," अशी माहिती शरद पवार यांनी भेटीनंतर दिली. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्या बैठकीनंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींमध्ये अर्धा तास बैठक झाली.


पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत शेतकरीप्रश्नी चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. यावेळी पवारांनी राज्यातील नुकसानाची माहिती नरेंद्र मोदींना देत वसंतदादा इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात होणाऱ्या साखरेच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं निमंत्रणही दिल्याची माहिती मिळत आहे. ही कॉन्फरन्स 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

शेतकरी प्रश्नी मोदींची भेट : शरद पवार

या भेटीची माहिती शरद पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते लिहितात की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यंदा अवकाळी पावसाने कहर केला, ज्यामुळे महाराष्ट्रातील 325 तालुक्यातील 54.22 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालं. याची पाहणी करण्यासाठी मी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक आणि विदर्भाचा दौरा केला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. परतीच्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच उभं पीक आडवं झालं. पंतप्रधानांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं."




संबंधित बातमी

शरद पवारांचे गुगली अस्त्र, 18 दिवसांमध्ये 10 विधाने