PM Narendra Modi :  मोदी भक्त" ही संज्ञा सोशल मीडियावर नकारात्मक अर्थानेच का होईना नेहमीच चर्चेत असते. मात्र सकारात्मक अर्थाने एक "मोदी भक्त" पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी तब्बल दोन हजार किलोमीटरच्या पायी यात्रेवर निघाला आहे. 17 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील "बदवेल" गावातून निघालेला "पथीपती नरसिम्हा" नावाच्या 32 वर्षीय तरुणाचे 17 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या वाढदिवशी दिल्ली गाठून त्यांना भेटण्याचा मानस आहे. त्यासाठी गेले 25 दिवस तो दररोज 35 ते 45 किमी पायी यात्रा करत आहेत. त्याने आतापर्यंत सुमारे 920 किमी ची यात्रा पूर्ण केली आहे.


आंध्र प्रदेशातील 32 वर्षांचा पथीपती नरसिम्हा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खासभक्त आहे. मोदींच्या वाढदिवशी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला निघालाय. मात्र इतर कार्यकर्ते जसे आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी हवाई यात्रा करतात तसा कार्यकर्ता पथीपती नाही.. तर तो मोदींना भेटण्यासाठी त्याच्या बदवेल गावातून दिल्लीसाठी पायी निघाला आहे. हातात मोदींचा एक बॅनर, त्यावर राष्ट्रीय ध्वज आणि खांद्यावर कपड्यांची एक बॅग, एवढे साहित्य घेऊन पथीपती रोज 35 ते 45 किलोमीटरचा पायी प्रवास करतो. 17 जुलैपासून आजवर त्याने सुमारे 921 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या गतीने 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या आधी दिल्ली गाठण्याचा त्याला विश्वास आहे. 


अंगात साधा दिसणारा पांढरा सदरा, पांढरी धोती, गळ्यात भगवा दुपट्टा घातलेला पथीपती तुम्हाला ग्रामीण भागातून आलेला सामान्य तरुण वाटेल. मात्र, तो उच्च शिक्षित असून एमबीए नंतर एका हॉटेलमध्ये मॅनेजमेंट पाहण्याचे काम करत आहे. मात्र, मोदींवरील प्रेमाखातर पथीपती ने दोन महिन्याची सुट्टी घेत दिल्लीची पायी वाट धरली आहे... मोदींचे पाकिस्तान विरोधातले सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिराचे निर्माण कार्य, कलम 370 हटवणे, बेटी बचाव - बेटी पढाओ सारख्या मोहिमा राबवणे खूपच आवडल्याचं त्यानं सांगितलं. मोदींच्या कामांना भावून तो स्थानिक पातळीवर भाजपशी जोडला गेला... मात्र, राजकारणात रुळला नाही आणि थेट दिल्लीची वाट धरली...


रोज सकाळी 6 वाजता पथीपती प्रवास सुरु करतो. वाटेतच चहा नाश्ता घेतो. शक्य तिथे जेवण करतो आणि रात्री भाजपच्या स्थानिक कार्यालयात किंवा मंदिर अथवा पेट्रोलपंपावर रात्र काढतो... पुन्हा सकाळी आपल्या देवाला भेटण्यासाठी पुढचा प्रवास सुरू करतो. या तरुणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.