तिरुवनंतपुरम : केरळमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारी किंवा खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. पण यंदा केरळ सरकारने नवीन आकडेवारी समोर ठेवली आहे. यावर्षी खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणारे 1 लाख 24 हजार विद्यार्थी कोणत्याही जाती किंवा धर्माचे नाहीत, असं केरळ सरकारने सांगितलं आहे.


केरळ विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तरादरम्यान सीपीएम आमदार डीके मुरली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, राज्याचे शिक्षणमंत्री सी रवींद्रनाथ यांनी ही माहिती दिली. धर्म आणि जात जाहीर न करणाऱ्या मुलांची संख्या यंदा सर्वाधिक असल्याचंही ते म्हणाले.

2017-18 या शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश घेणाऱ्या 1.24 लाख विद्यार्थ्यांनी आपली जात आणि धर्म जाहीर केलेला नाही. जात आणि धर्माचा रकाना त्यांनी रिकामा ठेवला. ही संख्या पहिली ते दहावी इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची आहे.

ही आकडेवारी राज्यातील 9209 सरकारी आणि खासगी शाळांमधून जमा केली आहे. ऑनलाईन अडमिशन झाल्याने हे आकडे समोर आले आहेत.

पहिलीपासून दहावीपर्यंतच्या 1,23,630 विद्यार्थ्यांनी आपली जात आणि धर्म सांगितला नाही. तर अकरावीतल्या 278 आणि बारावीच्या 239 विद्यार्थ्यांनी आपल्या जाती आणि धर्माचा उल्लेख केलेला नाही.

हा आकडा 2017-18 या शैक्षणिक वर्षाचा आहे. मात्र जिल्हा तसंच क्षेत्रनिहाय आकडे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.