विस्थापितांसाठी उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकरांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2017 07:44 AM (IST)
मेधा पाटकर यांच्यासह 12 जणांना मध्य प्रदेश पोलिसांकडून अटक
मध्य प्रदेश : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पोलिसांनी बळाचा वापर करत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील चिखल्दा गावात मेधा पाटकर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत होत्या. गेल्या 12 दिवसांपासून मेधा पाटकर सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसल्या होत्या. मेधा पाटकर यांच्या उपोषणस्थळी पोलिस पोहोचले आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांशी पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासोबत एकूण 12 कार्यकर्त्यांना अटक केली आणि रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. विशेष म्हणजे उपोषणाच्या माध्यमातून मेधा पाटकर यांनी गेल्या 12 दिवसांपासून आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. मात्र, अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने सर्वच स्तरातून मध्य प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. सरदार सरोवरावरील धरणाची उंची वाढवली गेली, तर नर्मदा नदीच्या परिसरातील सुमारे 192 गावांना फटका बसेल. जवळपास 40 हजार कुटुंब विस्थापित होण्याची भीती आहे. त्यामुळे या सगळ्यांचं पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार मेधा पाटकरांनी व्यक्त केला आहे.