लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी EVM वर आक्षेप घेत मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर भाजपने मतदान यंत्रात घोळ करुन विजय मिळवल्याचा गंभीर आरोपही मायावतींनी केला.
त्यामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मतमोजणी थांबवून, हा निकाल रद्द करा अशी मागणी मायावतींनी केली.
भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल, तर त्यांनी ही निवडणूक रद्द करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी असं मायावती म्हणाल्या.
मुस्लिम बहुल भागात जिथे भाजपचं काहीही अस्तित्व नव्हतं तिथे भाजपचा उमेदवार कसा काय विजयी होऊ शकतो, असा सवाल मायावतींनी केला.
याशिवाय EVM ची परदेशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, पुन्हा मतपत्रिकेद्वारे फेरमतदान घ्यावं, अशी मागणी मायावतींनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मतदान यंत्रात घोळ करुन भाजपने विजय मिळवला आहे, असं म्हणत मायावतींनी महाराष्ट्रातील EVM तक्रारीचाही दाखला दिला. महाराष्ट्रातील नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत EVM मध्ये घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये EVM घोटाळा केल्याचा आरोप मायावतींनी केला.