Maharashtra Assembly Winter Session 2022: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. श्रद्धाने तुळींज-नालासोपारा पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेतली. यासाठी पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता असेही फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.  


आज सभागृहात श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या चर्चेची सुरुवात करताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव राजकीय होता का, असा प्रश्न उपस्थित केला. अमरावती येथे कोल्हे प्रकरण घडले. त्यावेळी एनआयएने प्रकरण हातात घेतल्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले. त्यामुळे श्रद्धाने तक्रार मागे घेण्याबाबत त्यावेळीचा सरकारमधील प्रमुखांचा दबाव होता का? असा प्रश्न भातखळकरांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तिच्या वडिलांची माझी भेट झाली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला. गुन्हेगाराने ज्या फ्रीजमध्ये तुकडे ठेवले होते तिथंच ठेवलेले कोल्ड्रिंक पित होता. या प्रकरणात राजकीय दबाव आढळून आलेला नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. श्रद्धाने तक्रार दिली आणि एक महिन्यानंतर अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एक महिन्यात पोलिसांनी काय करवाई केली याची चौकशी करत आहोत. आम्ही पोलीस महासंचालकांच्या  अध्यक्षतेखली समिती नेमली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 


23 नोव्हेंबर 2022 ला श्रद्धाला मारहाण झाली होती त्याबाबत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मग एक महिन पोलीस काय करत होते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार उपस्थित केला. वालकर यांच्या सेटलमेंटच्या पत्रावर खाडाखोड असल्याचा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. त्यावर,  एक विशेष पथक तयार करुन चौकशी केली जाईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. 


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शक्ती कायद्याला उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. आंतरधर्मीय विवाह समितीला महिला आयोगाने विरोध केला आहे. याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे? असा प्रश्न त्यांनी केला. दुसरे श्रद्धा वालकर प्रकरण होऊ नये यासाठी भाईंदर येथील एका तरुणीचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. यावर भाईंदर पोलिसांना त्या तरुणांचा शोध घेऊन तिच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करू देण्यााचे निर्देश दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 


अमित शाह यांच्याशी चर्चा करा, अजित पवारांची मागणी


श्रद्धा प्रकरणी तुम्ही थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पुढील अधिवेशनापर्यंत चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला पाहिजे अशी सूचना अजित पवार यांनी केली. आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.


विशेष कायद्यासाठी अभ्यास सुरू 


देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आंतरजातीय विवाहाला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, आंतरधर्मीय जाणीवपूर्वक काही जिल्ह्यात होत आहेत. अशा मोठ्या प्रमाणात घटनासमोर येत आहे. लव्ह जिहाद हा विषय केरळमध्ये आणि त्याच्या बाहेरही आहे. लव्ह जिहाद हे नाव  केरळ पोलिसांनी दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकारच्या  गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागणार आहेत. त्यामुळेच काय कायदा करता येऊ शकेल याचा अभ्यास सरकार करत आहे. कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही फडणवीस यांनी म्हटले. 


एका धर्माची बदनामी


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीदेखील लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. अमरावतीमध्ये अल्पसंख्यक समुदाय दबावाखाली असल्याचे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादच्या नावाखाली एका धर्माची बदनामी केली जात आहे. श्रद्धा वालकर हे लव्ह जिहाद प्रकरण नसून  लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय आहे. आपण संस्कृती विसरत असल्याचा मुद्दा अबू आझमी यांनी मांडला.