पणजी : सर्वात शिस्तप्रिय संघटना म्हणून बिरुद मिरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे गोवा प्रांत प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजपविरोधात आवाज उठवला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाभारत घडलं. गोव्यातील 600 स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजीनामा दिला आहे.


 

सुभाष वेलिंगकर विधानसभा निवडणूक लढवणार

 

सुभाष वेलिंगकर यांनी गोवा आरएसएस नावाची नवी संघटना स्थापन करत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्याचसोबत, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही वेलिंगकरांनी केली आहे. वयाच्या 13 व्या वर्षी संघाशी जोडलेल्या वेलिंगकरांचं गोव्यातील राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. शिवाय, भारतीय भाषा सुरक्षा मंच नावाची संघटनाही वेलिंगकर चालवतात.

 

संघानं सुभाष वेलिंगकरांची हकालपट्टी केली. भाजपविरोधात बोलल्यामुळे एखाद्या पदाधिकाऱ्याची अशी हकालपट्टी करण्याची ही पहिली घटना आहे. मात्र वेलिंगकरांची हकालपट्टी नाही तर पदमुक्त केल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.

 
गेल्या तीन दशकांपासून वेलिंगकर संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. गोव्यातील प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीनं जनआंदोलन उभारलं. गोव्यात भाजपविरोधात असताना त्याला भाजपचीही साथ होती. पण सत्ता आल्यानंतर भाजपनं घुमजाव केल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला आहे.

 
गेल्या काही दिवसात भाजप विरुद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा वाद सुरु आहे. पण मंचाच्या कार्यकर्त्यांनी गोव्याच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहांना काळे झेंडे दाखवले. कदाचित संघ नेतृत्वाला ते रुचलं नसावं आणि त्यातून त्यांना पदमुक्त केलं. त्यामुळे गोव्यातील चारशे स्वयंसेवक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

 
देशातली सर्वात मोठी आणि शिस्तप्रिय संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची ओळख आहे. त्यामुळे आजपर्यंत कुठल्याही अंतर्गत मुद्द्यावर संघाचा वाद कधीच चव्हाट्यावर आला नाही किंवा तशी वेळही संघानं येऊ दिली नाही. पण आता वेलिंगकरांची गच्छंती आणि त्यानंतर झालेली बंडाळी पाहता संघाला आपल्या करड्या शिस्तीबद्दल ‘दक्ष’ राहावं लागेल. हे नक्की