लखनौ : पुलवामा हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमधील पंकजकुमार त्रिपाठी हा जवान शहीद झाला. पंकजकुमार शहीद झाल्याची बातमी माध्यमांद्वारे त्यांच्या गावामधील लोकांना समजल्यापासून गावामध्ये शोकाकूल वातावरण आहे. बातमी समजल्यावर पंकजकुमार यांची आई सुशीलादेवी आणि त्यांची पत्नी रोहिणी बेशुद्ध दोघीही झाल्या. शुद्धीवर आल्यानंतर शहीदपत्नी रोहणी त्रिपाठी म्हणाल्या की, "पंकज यांच्यासोबत शेवटचे बोलणं झालं, तेव्हा त्यांनी दोन महिन्यांमध्ये परत येण्याचं वचन दिले होतं."

गुरुवारी रात्री पंकजकुमार यांच्या गावामधील लोकांना पंकजकुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी संपूर्ण गावभर ‘जब तक सूरज चांद रहेगा, पंकज तेरा नाम रहेगा’ चा जयघोष सुरु झालेला ऐकायला मिळाला.

पंकजकुमार त्रिपाठी (35) महराजगंज जिल्ह्यातील हरपूर मिश्र गावातील रहिवासी आहेत. पंकजकुमार शहीद झाल्याची बातमी समजल्यापासून गावामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वीच पंकजकुमार सुट्टीहून कर्तव्यावर परतले होते. बुधवारी ते ड्यूटीवर रुजू झाले.

घटनास्थळावरुन केवळ मोबाईल आणि ओळखपत्रच सापडले
जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 40 जवान शहीद झाले. जवानांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले. परंतु पंकज त्रिपाठी यांचा मृतदेह सापडला नाही. घटनास्थळी केवळ त्रिपाठी यांचे ओळखपत्र आणि मोबाईल सापडला आहे. सीआरपीएफ मुख्यालयाने त्रिपाठी यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. त्रिपाठी यांचे कुटुंबीय जम्मूसाठी रवाना झाले आहेत.