Martyr Deepak Singh : गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या झटापटीवेळी शहीद झालेले नायक दीपक सिंह यांची पत्नी रेखा देवी आता भारतीय सैन्यात भरती होणार आहेत. जून 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामध्येच मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील दीपक सिंह शहीद झाले होते.


दीपक त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी रेखा देवी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे वीरचक्र पदान करण्यात आले होते. 


शहीद दीपक यांची 23 वर्षीय पत्नी रेखा देवी यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्थेची (OTA) परीक्षा दिली आहे. या परीक्षेत त्या पास झाल्या आहेत. रेखा देवी या परीक्षेत पास झाल्यानंतर आता त्यांची मेडिकल तपासणी होणार आहे. त्यामुळे पती दीपक सिंह यांच्यानंतर त्याही देशाची सेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल होत आहेत. 


 OTA च्या परीक्षेत पास झाल्यानंतर रेखा देवी यांनी प्रयागराज येथील सेवा निवड मंडळात पाच दिवस मुलाखतीचे राऊंड दिले. त्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. रेखा देवी या आता 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतील. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्यक्षात आपल्या देश सेवेला सुरूवात करतील. 


नायक शहीद दीपक सिंह हे मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यातील राहणारे होते. ते बिहार रेजिमेंटमधील 19 व्या बटालियमध्ये कार्यरत होते. दीपक सिंह हे वैद्यकीय सहाय्यक होते. गलवान खोऱ्यात चीन सैनिकांसोबत भारतीय सैन्याची झटापट झाली त्यावेळी दीपक सिंह यांनी 30 जवानांना  वैद्यकीय सेवा पुरवली होती. परंतु, सेवा पुरवत असताना ते स्वत:ही जखमी झाले होते. उपचार सुरू असताना ते शहीद झाले. लग्नानंतर फक्त एकदाच दीपक सिंह पत्नी रेखा देवी यांना भेटले होते. 


महत्वाच्या बातम्या