नवी दिल्ली : सतत वादात अडकणाऱ्या माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी नवा वाद निर्माण केला आहे. काटजू यांनी भारतीय लष्कर प्रमुखांची तुलना थेट ब्रिटीश अधिकारी जनरल डायरसोबत केली आहे. त्यामुळे काटजू यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.


शनिवारी भारतीय लष्कराच्या कारवाईत 3 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी भारतीय जवानांवर हल्ला चढवला. जवान आणि नागरिकांमध्ये काही तास धुमश्चक्री उडाली. या घटनेची तुलना काटजू यांनी थेट जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली आहे. काटजू यांनी लष्कर प्रमुखांची तुलना जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या ब्रिटीश अधिकारी जनरल डायरशी केली.

या प्रकारानंतर भारतीय सैन्याच्या विविध अधिकाऱ्यांनी जस्टीस काटजू यांना चांगल्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काटजू यावरच थांबले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून स्वतःचा बचाव करत काश्मिरी जनतेलाही अनेक सल्ले दिले आहेत.