पणजी : गोवा विधानसभेच्या मांद्रे मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेले आमदार दयानंद सोपटे यांनी मराठीमधून आमदारकीची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे.

या मोहिमेला प्रतिसाद देत आमदार दयानंद सोपटे यांनी मराठीमधून आमदारकीची शपथ घेतली. भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी कोकणीमधून शपथ घेतली तर काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात आणि भाजपच्या जोशुआ डिसोझा यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये विजयी झालेल्या चार आमदारांनी काल पर्वरी येथील विधानसभा भवनातील पीएसी सभागृहात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात आमदारकीची शपथ घेतली. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी चारही नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ दिली.

गोव्यात लोकसभे बरोबर विधानसभेच्या चार पोटनिवडणुका पार पडल्या होत्या.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजीची, माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे म्हापशाची तर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. मांद्रे, म्हापसा आणि शिरोड्यात भाजप तर राजधानी पणजीमध्ये भाजपचा 25 वर्षांचा गड काबीज करून काँग्रेसने विजय मिळवला आहे.

#मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून ट्रेंड
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटरवर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे. अनेकांनी या मोहिमेला समर्थन देत ट्वीट केलं आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असा यामागे उद्देश आहे. मराठी भाषा प्राचीन भारतीय भाषा आहे. तसेच मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटरवर केला जात आहे. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या जवळपास सर्वच खासदारांना उत्तम मराठी येते. म्हणून सर्व खासदारांनी मराठीत खासदारकीची शपथ घ्यावी. तसेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नेटीझन्सकडून होत आहे.

संबंधित बातम्या

#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी
#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी

#मराठीतशपथ : शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेणार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती