India Coronavirus Updates : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 4 हजार 858 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याआधी 18 सप्टेंबरला देशात 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या चार हजारांपर्यंत खाली घसरली आहे.


कोरोनाचा आलेख घटतोय


देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. देशात सध्या 48 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी रविवारी ही संख्या 47 हजारांवर होती. तर त्याआधी शनिवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 46 हजारांवर होती. सध्या देशात 48 हजार 27 सक्रिय रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 28 हजार 355 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 






महाराष्ट्रात 602 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात रविवारी 602 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 621 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1071 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1222 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 744 सक्रिय रुग्ण आहेत. 


मुंबईत रविवारी 104 रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासांत 104 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,253 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,725 झाली आहे. सध्या मुंबईत 1,071 रुग्ण आहेत.