पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पर्रिकर यांचा वैद्यकीय अहवाल 24 तासांच्या आत जाहीर करण्याच्या मागणीबरोबरच, कॉंग्रेसने पुढील रणनीती ठरवण्यासाठी विधीमंडळ गटाची आज दुपारी बैठक बोलावून भाजपवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आरोग्याच्या मुद्द्यावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री होईल या भीतीने दुसरा मुख्यमंत्री नेमला जात नसल्याची टीका करत, काँग्रेसने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी काल पर्रिकर हे वारंवार प्रकृती बिघडल्याने मुंबई-अमेरिका येथे उपचारासाठी जातात. परंतु भजपने अद्यापही त्यांच्याबाबत कोणताही वैद्यकीय अहवाल जाहीर केलेला नाही. ही कृती चुकीची असून पर्रिकर मुंबई आणि अमेरिकेतून किती दिवस प्रशासन चालवणार आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.
सध्या लोकशाहीची विटंबना चालू असून पर्रिकरांनी हट्टीपणा सोडावा आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, अशी मागणीही भिके यांनी केली आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढल्याने भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता मुख्यमंत्रीपदी नेमावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आज होणाऱ्या काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत याच विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा असेही काँग्रेसला वाटते.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारांसाठी पुन्हा अमेरिकेत गेल्यामुळे निर्माण झालेला नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मावळल्यात जमा असून सरकारमध्ये कोणताही नेतृत्व बदल होणार नसल्याचे भाजप आणि मगो नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नेतृत्व बदलासंदर्भात वक्तव्याकरुन नाराजी ओढवून घेतल्याचे मानलं जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी मनोहर पर्रिकर हेच सरकारचे नेतृत्व करत असून नेतृत्व बदलाचा कोणताही विषय नसल्याचं स्पष्ट केल आहे. मात्र तरी 2 दिवसांपूर्वी जो प्रकार झाला त्यावरुन भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र समोर आलं आहे.
भाजपची गाभा समिती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटणार असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं, मात्र राष्ट्रीय अध्यक्षांना नेतृत्वबदलासंदर्भात भेटण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री केवळ आठ दिवसांसाठी अमेरिकेला जात असल्याने त्या मुद्यावरुन नेतृत्व बदल करण्याची गरज नाही, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केलं आहे.
मनोहर पर्रिकर लिलावती रुग्णालयात दाखल
विरोधी काँग्रेस पक्ष पूर्णवेळ मुख्यमंत्री देण्याची मागणी करत आहे. त्याचबरोबर सरकार बरखास्तीचीही मागणी करत आहे. मागील तीन, चार महिन्यापासून काँग्रेस नेते अशा प्रकारची मागणी करीत आहेत. राज्यपालांना भेटून काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावाही केला होता. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक नेतृत्व बदलासंदर्भात बोलत असल्याने भाजपमध्ये त्यावरुन बरीच चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमासमोर श्रीपाद नाईक यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळेही नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री केवळ आठ दिवसांसाठी अमेरिकेत : ढवळीकर
मुख्यमंत्री आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेला गेले आहेत. केवळ आठ दिवसात मुख्यमंत्री परत येतील. त्यामुळे नेतृत्व बदलाचा विषय नसल्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. तोपर्यंत अन्य मंत्री आणि अधिकारी प्रशासन चालवतील, मात्र मगो पक्षाने पर्रिकरांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मगो पक्ष केवळ पर्रिकरांच्या नेतृत्वाखालील सरकारचाच विचार करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी : काँग्रेस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2018 11:23 AM (IST)
सध्या लोकशाहीची विटंबना चालू असून पर्रिकरांनी हट्टीपणा सोडावा आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, अशी मागणीही भिके यांनी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -