गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पर्रिकरांना दोन माणसे हाताला धरुन घेऊन येतात आणि घेऊन जातात ही स्थिती पाहावत नाही. पर्रिकर यांनी आता सन्मानाने खुर्ची सोडावी, असा सल्ला गोवा काँग्रेसने आज दिला आहे.


गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रेजिनाल्ड म्हणाले, पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा असे आम्ही त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यांना स्वत:हून त्यांची स्थिती कळायला हवी.


पर्रिकर यांची सध्याची स्थिती पाहिली तर त्यांनी आरोग्याकडेच लक्ष देण्याची गरज आहे. गोव्याची जगासमोर योग्य प्रतिमा जात नाही. फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर हे भाजपाचे दोन आमदार ज्याप्रमाणे सध्या आरोग्याची काळजी घेत आहेत, तशी काळजी पर्रिकर यांनी घ्यावी. त्यांनी सन्मानाने पायउतार होण्याची ही वेळ असल्याचे रेजिनाल्ड यांनी म्हटलं.


दिगंबर कामत यांनी लोकांनी थेट पद्धतीने टीव्हीवर कामकाज पाहिले असल्याचे सांगून म्हणाले, सत्ताधारी व विरोधक आणि एकूण प्रत्येकाची कामगिरी लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे जास्त काही बोलण्याची गरज नाही.


रमाकांत खलप म्हणाले, गोव्याला जर योग्य स्थितीतील सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता तर यावर्षी गोव्याला चांगला अर्थसंकल्प मिळाला असता. पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्याकडे द्यावा. त्यांनी राजीनामा देऊन घरी आराम करावा असे मी म्हणत नाही, मात्र तात्पुरता तरी दुसऱ्याकडे ताबा देणे गरजेचे आहे.