नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषी शुक्ला 1983 बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. दोन वर्षांसाठी त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


ऋषी शुक्ला यांनी मध्ये प्रदेशच्या पोलीस महासंचालकपदाचा कारभारही पाहिला आहे. शुक्रवारी सीबीआय संचालक निवड समितीची बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र अखेर ऋषी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.


आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांमधील वादानंतर सीबीआयच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती सीबीआयची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याचं आव्हान शुक्ला यांच्यासमोर असणार आहे.


सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना संचालक पदावरुन हटवून त्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती. त्यामुळे गेले काही दिवस सीबीआयचं संचालक पद रिक्त होतं.