पणजी/ गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर त्यांच्या सरळ आणि साध्या स्वभावामुळे सर्वांना परिचित आहेत. त्यांचं गोव्यातून स्कूटरवरुन फिरणं अनेकदा माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय, त्यांच्या स्कूटरवरुन फिरण्यावरुन अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. पण आता त्यांनी स्कूटर चालवणं बंद केलं आहे.
विशेष म्हणजे, या पाठीमागे माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या किंवा त्याबाबत सांगितले जाणारे किस्से हे कारण नाही. तर अपघातांच्या भीतीमुळे त्यांनी स्कूटर चालवणं सोडून दिल्याचं सांगितलं आहे.
शनिवारी गोव्यातील कानाकोनामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी याबाबतचा उलगडा केला आहे. पर्रिकर म्हणाले की, “सध्या लोक मला नेहमी विचारतात की, तुम्ही खरंच स्कूटरवरुन प्रवास करता का? तर मी त्यांना सांगतो, हो पूर्वी करत होतो. पण आता सोडून दिलं आहे.”
या मागचं कारण स्पष्ट करताना पर्रिकर पुढे म्हणाले की, “माझ्या मनात कामासंदर्भात विचारचक्र नेहमीच सुरु असतं. त्यातच स्कूटर चालवताना जर माझं लक्ष विचलित झालं, तर मला एखाद्या मोठ्या अपघाताला मला सामोरं जावं लागेल. म्हणून मी आता स्कूटर चालवणं सोडून दिलं आहे.”
दरम्यान, पर्रिकर पणजीमधील बाजारात सामान खरेदीसाठी स्कूटरवरुन जात असल्याचं वृत्त यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमधून नेहमीच प्रसिद्ध झालं आहे. पण आता त्यांचं स्कूटरवरुन जाणं बंद झाल्याने अनेकवेळा यावरुन प्रश्न उपस्थित केला जायचा. पण त्याला मनोहर पर्रिकरांनीच उत्तर दिलं आहे.