नवी दिल्ली : महाराष्ट्राची वीरांगना अर्थात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासह निधी दुबे यांच्या धैर्य आणि धाडसाचा मोदींनी दाखला दिला.


या दोन्ही महिलांनी देशभक्ती आणि महिला शक्तीचं अनोखं रुप सर्व देशवासियांना दाखवल्याचं मोदी म्हणाले. पती कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात भरती होण्याच्या निश्चय केला होता. 15 दिवसांपूर्वीच त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.

पतीच्या पार्थिवावर देशसेवेचा निर्धार

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता.

पतीच्या निधनानंतर निधी मिश्रा सैन्यात सामील

निधी मिश्रा दुबे प्रेग्नंट असताना त्यांचे पती मुकेश दुबे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुकेश दुबे हे महर रेजिमेंटमध्ये नाईकपदावर कार्यरत होते. सैन्यात असणं म्हणजे काय असतं हे मुलगा सुयशला दाखवण्यासाठी निधी यांनी देशसेवेचा निर्धार केला. पण हे सोपं नव्हतं. पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आल. "पण आता तो भूतकाळ आहे. आता मी देशसेवेसाठी तयार आहे," असं निधी मिश्रा म्हणतात.

निवृत्त शिक्षक चंद्रकांत कुलकर्णींचंही मोदींकडून कौतुक

स्वच्छतेसाठी दान करणाऱ्या महाराष्ट्रातील निवृत्त शिक्षकाचाही मोदींनी उल्लेख केला. चंद्रकांत कुलकर्णी यांचं उदाहरण दिल्यानंतर देशभरातून अनेक जण पुढे आल्याचं मोदींनी सांगितलं. भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी तुमच्या राज्यातील सात सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन्स तुम्हाला माहिती हवीत, असंही मोदी म्हणाले.

मन की बातची तीन वर्ष

मन की बात या कार्यक्रमाचा आज 36 वा भाग प्रसारित झाला. आज या कार्यक्रमाची सुरुवात होऊन तीन वर्ष पूर्ण झाली. मन की बातची तीन वर्ष ही देशवासियांच्या भावना आणि अनुभवाचा प्रवास आहेत, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, वीरपत्नी स्वाती महाडिक 'इंडियन आर्मी'त रुजू

सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव

देखना है जोर कितना…शहीद महाडिकांची पत्नी ‘इंडियन आर्मी’त!

शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस

शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार

शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन

शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात…