नवी दिल्ली: 2007 साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते. 11 नोव्हेंबर 2007 रोजी रशियाच्या दौऱ्यावर रवाना गेलेले असताना मॉस्कोमध्ये एअर इंडियाचं विमान लॅण्ड करताना क्रॅश होण्यापासून बचावलं होतं.
टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे की, 'एअर इंडिया वनच्या विमान बोईंग 747नं लॅण्डिंगच्या वेळी आपलं लॅण्डिंग गिअर खाली केले नव्हते. त्यानंतर मॉस्को एटीसीनं ही बाब ध्यानात आणून दिल्यानंतर विमानाची चाकं उघडण्यात आली.
विमानाच्या डेटा रेकॉर्डरच्या मते, 'व्हीव्हीआयपी विमान इलेक्ट्रॉनिक ग्लाइड स्लोपच्या खाली उड्डाण करत होतं. इलेक्ट्रॉनिक ग्लाइड स्लोप हा विमानाचा रस्ता असतो. हाच रस्ता पाहून विमान धावपट्टीवर उतरवलं जातं.
एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "एफडीआर डेटाच्या मते, विमान फार कमी उंचीवर होतं. त्यामुळे ही फारच हैराण करणारी गोष्ट होती." तसंच मॉस्को एटीसीचं म्हणणं आहे की, विमानाचे लॅण्डिंग गिअर खाली केलेले नव्हते. त्यानंतर कॉकपिटमध्ये एक अलार्मही वाजला होता.