Election 2022 : पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बऱ्याच दिवसांनी भाष्य केलं आहे. परदेशी नेत्यांना जबरदस्ती मिठी मारण्यानं किंवा न बोलवता बिर्याणी खायला जाण्यानं संबंध सुधारत नाहीत, असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लगावला आहे. 'हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी' असं म्हणणाऱ्या मनमोहन सिंह यांनी अखेर आपलं मौन सोडत भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
व्हिडीओ संदेश जारी करत भाजप सरकारवर टीका
मनमोहन सिंह यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की. सरकारनं ही गोष्टही लक्षात घ्यावी की केवळ वरवरचा दिखाऊपणा करण्यानं परिस्थिती बदलत नाही. सत्य कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रुपात दिसून येतच, असं मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी केवळ बोलणं सोपं असतं मात्र त्यावर अमल करणं कठिण असतं. मी आशा व्यक्त करतो की सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट आता लक्षात आली असेल.
सत्ताधारी आपल्या चुका मान्य न करता नेहरुंना जबाबदार धरताहेत
मनमोहन सिंह यांनी म्हटलं की, भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशाची स्थिती अशी आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अजून गरीब होत चालले आहेत. कोरोना काळात केंद्राच्या वाईट धोरणांमुळं लोक आर्थिक समस्या, बेरोजगारी, वाढत्या महागाईनं त्रस्त आहे. साडेसात वर्ष सरकार चालवल्यानंतरही भाजप सरकार आपल्या चुका मान्य करायला तयार नाही. भाजप सरकार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार ठरवत आहे.
सरकारचा राष्ट्रवाद हा नकली, तेवढाच धोकादायक
या व्हिडीओत मनमोहन सिंह पुढे म्हणतात की, सरकारचा राष्ट्रवाद हा नकली आहे तेवढाच धोकादायक देखील आहे. यांचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या तोडा फोडा आणि राज्य करा या धोरणावर चालणारा आहे. संविधानिक संस्थाना कमजोर केलं जात आहे. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, असंही सिंह म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha