नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आज 29 एप्रिलला त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनमोहन सिंग यांना 19 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांना आधीच कोरोना लस 'कोवॅक्सिन'चे दोन डोस देण्यात आले आहेत. 






डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 1990 मध्ये त्यांची पहिली शस्त्रक्रिया युनायटेड किंगडममध्ये झाली आणि 2004 मध्ये एस्कॉर्ट रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. 2009 मध्ये एम्समध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या वर्षी कोरोना काळात म्हणजेच मे महिन्यात ताप आल्याने मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 


डॉ. मनमोहन सिंह यांच्या मोदी सरकारला पत्र लिहून पाच महत्वाच्या सूचना


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहून पाच महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये लसीकरणामध्ये पारदर्शकता आणत येत्या सहा महिन्याचा रोडमॅप तयार करण्याची सूचना केली होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजकीय उत्तर दिलं असलं तरी त्यांच्या सूचना या बऱ्यापैकी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे. 


लसीचे विकेंद्रीकरण आणि राज्यांना स्वायत्तता


महत्वाचं म्हणजे लसीचे विकेंद्रीकरण करून राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची सूचना केली होती. त्यामुळे राज्ये आपल्या गरजेनुसार, कोरोनाच्या लसींचा वापर करू शकतील. आता ही सूचना केंद्र सरकारनं स्वीकारल्याचं  दिसून येतंय. लस उत्पादकांना लसीचा 50 टक्के साठा हा केंद्राला देण्यात यावा आणि 50 टक्के साठा हा राज्यांना देण्यात यावा असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच राज्यांना खुल्या बाजारातून लस खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या राखीव साठ्यातील लसी या राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची सूचना डॉ. मनमोहन सिंह यांनी केली होती. ही सूचना आता केंद्र सरकारने आहे तशी स्वीकारल्याचं दिसून येतंय.  


महत्वाच्या बातम्या :