नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था, नोटाबंदी आणि जीएसटीबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये आता आर-पारची लढाई पाहायला मिळणार आहे.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नोटाबंदी म्हणजे विनाशकारी आर्थिक निती असल्याचं सोमवारी म्हटलं होतं. त्यानंतर आज ते पुन्हा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकारवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

अर्थमंत्री अरुण जेटलींची पत्रकार परिषद

एकीकडे विरोधक आक्रमक झाले असताना, दुसरीकडे सरकारही उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे दिल्लीत मोर्चा सांभाळणार आहेत. जेटली हे मनमोहन सिंहांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतील.

त्यामुळे आज माजी पंतप्रधान आणि विद्यमान अर्थमंत्री यांच्यात आज जुगलबंदी पाहायला मिळू शकते.

मोदींनी आपली चूक मान्य करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी ही मोठी चूक होती हे मान्य करुन, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं, असं मनमोहन सिंह सोमवारी म्हणाले होते. तसंच नोटाबंदी म्हणजे ब्लंडर अर्तात विनाशकारी आर्थिक निती असल्याचंही सिंह म्हणाले होते.

नोकऱ्यांवर थेट परिणाम झाल्याचा दावा

नोटाबंदीचा थेट परिणाम रोजगार आणि नोकऱ्यांवर झाल्याचा दावा मनमोहन सिंह यांनी केला. आपल्या देशातील तीन चतुर्थांश रोजगार हे लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्रात आहे. नोटाबंदीचा या क्षेत्रालाच सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्याच गेल्या, असं मनमोहन सिंह म्हणाले.

नोटाबंदीची वर्षपूर्ती

8 नोव्हेंबर म्हणजे उद्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने विरोधकांकडून काळापैसा दिवस साजरा करण्यात येणार आहे, तर सरकारकडून काळापैसा विरोधी दिवस साजरा करण्यात येईल.