नवी दिल्ली: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसवर आज अस्तित्व शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकीनंतर तर काँग्रेसच्या नेतृत्वावरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका वक्तव्यानं ही चर्चा सुरु झाली. या  संपूर्ण परिस्थितीबाबत मणिशंकर अय्यर यांनी ‘एबीपी माझा’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भावी वाटचालीविषयी आपली मतं मांडली.


‘काँग्रेसला काही भविष्यच नाही अशी स्थिती बिल्कुल नाही, पण एकटी काँग्रेस मोदींना हरवू शकत नाही हे देखील खरं आहे. त्यामुळे २००४ मध्ये सोनियांनी ज्या पद्धतीनं अनेक पक्षांना सोबत घेतलं तसं राहुल गांधींनी आता करावं. मोदी मुक्त भाजप आणि भाजप मुक्त भारत करायची गरज आहे.’ असं स्पष्ट मत अय्यर यांनी व्यक्त केलं.

‘उत्तर प्रदेशमध्ये भाजपला भले ३२५ जागा मिळाल्या. पण अजूनही साठ टक्के लोकांचं मतदान मोदींच्या विरोधात आहे. २०१४ मध्येही सत्तर टक्के लोकांनी मोदींना मत दिलेलं नाही. आम्ही विखुरलेले आहोत त्याचाच फायदा भाजपला झाला.’ असंही अय्यर म्हणाले.

मोदींना रोखायला शिवसेनेलाही सोबत घेणार का?... यावर मणिशंकर अय्यर यांचं उत्तर:

‘मोदींना रोखायला शिवसेनेलाही सोबत घेणार का? याबाबत अय्यर म्हणाले की, ‘होमिओपॅथिमध्ये विष काढायला आणखी जहरी विषाचा वापर होतो, पण राजकारणात असं करता येत नाही. जे एकात्म भारताच्या कल्पनेचं स्वागत करतात, त्यांना सोबत घ्यायला हवं.’ असं म्हणत अय्यर यांनी शिवसेनेला सोबत न जाण्याचं स्पष्ट केलं.

‘राहुल गांधींविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढायला कुणी तयार होत नाही. सोनियांच्या विरोधात जे जितेंद्र प्रसाद लढले त्यांचं काय झालं?  केवळ राहुल गांधींना नावं ठेवून चालणार नाही, संघटनही मजबूत करायला हवं. ‘ असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.

‘मोदी आता ज्या योजनांची महती गात आहेत, ते काँग्रेसचे कार्यक्रम आहेत. आता फक्त त्याला भगवा रंग दिला गेला आहे. प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये संधी मिळत नाही. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे.’  असंही अय्यर यांनी सांगितलं.

VIDEO: