नवी दिल्ली/लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता पराभूत आमदारांनी, आमदार निवासातून सामान हलवण्यास सुरुवात केली आहे.

समाजवादी पक्षातील अनेक आमदार आणि मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता प्रत्येकाला सरकारी घरं रिकामी करावी लागत आहेत.

रवीदास मेहरोत्रा या माजी मंत्र्याचाही पराभव झाला. मात्र त्यांनी रिकामं केलेलं घर आणि त्या घराला लावलेलं कुलूप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. कारण मेहरोत्रा यांनी घराला लावलेल्या कुलुपावर मोदी मॅजिक असं लिहिलेलं आहे.

रोहीदास मेहरोत्रा हे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी लखनऊ मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र भाजपचे ब्रजेश पाठक यांनी त्यांचा पराभव केला. 

उत्तर प्रदेशात भाजपने विरोधकांचा अक्षरश: सूपडासाफ केला. 403 सदस्य संख्या असलेल्या यूपी विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षाने 325 जागा जिंकल्या. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला 54, तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला  19 जागाच मिळाल्या.