मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2017 12:26 PM (IST)
इंफाळ : मणिपूरची आयर्न लेडी अशी ख्याती असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शर्मिला यांना पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी इरोम शर्मिलांना पराभवाची धूळ चारली. पिपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स (प्रजा) च्या प्रमुख असलेल्या इरोम चानू शर्मिला मणिपूरमधील थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला यांना अवघी 90 मतं मिळाली आहेत. शर्मिला यांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याची इच्छाही काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती. निकालाच्या दिवशी सकाळी मात्र शर्मिला यांना विजयाची खात्री वाटत नसावी. पराभव झाल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नशिब आजमवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. बळ, सत्ता आणि पैशाचा वापर सर्वच पक्ष उघडउघड करत आहेत, हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोपही त्यांनी केला. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं.