उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा, अशी इच्छा साक्षी महाराज यांनी व्यक्त केली आहे. यूपीमध्ये 20 ते 22 टक्के दलित समाज आहे, 27 टक्के मागासवर्गीय आहेत. हे लक्षात घेता दलित किंवा ओबीसींना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी साक्षी महाराजांची इच्छा आहे.
भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केलेला नाही. मात्र भाजपचं संसदीय बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल, असं भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बहुमत आल्यास कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अवघ्या देशाचं लक्ष प्रामुख्याने लागलं आहे ते उत्तर प्रदेशकडे. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्यानं या राज्यावर प्रत्येक पक्षाला आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. उत्तर प्रदेशवर सत्ता मिळवणं हे मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यावर राज्यसभेतली अनेक समीकरणं अवलंबून आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समाजावादी पक्ष आणि राहुल गांधी यांचा काँग्रेस एकत्र लढत आहेत. सपा-काँग्रेसला भाजपचं तगडं आव्हान आहे. तर मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीही कडवी झुंज देत आहे.