Manik Saha Oath : माणिक साहा यांनी आज त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल सत्यदेव नारायण राय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिप्लब देब यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी भाजपची बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रदेश युनिटचे अध्यक्ष माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष असून, ते राज्यसभेचे खासदारही आहेत. त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये भाजप नेते पक्ष सोडून जात होते. त्यामागचे कारण बिप्लब देब असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, हायकमांडची भेट घेतल्यानंतर बिप्लब देब यांनी राजीनामा दिला होता. याआधी शुक्रवारी, 13 मे रोजी बिप्लब देब यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीच्या अवघ्या 24 तासांनंतर 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा सादर केला होता. बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरुनच राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते.
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले बिप्लब देब?
राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब म्हणाले, की पक्ष शीर्षस्थानी आहे. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला असे वाटते की मी दिलेल्या जबाबदारीला न्याय दिला आहे, मग ते राज्य भाजपचे अध्यक्षपद असो किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद असो. मी त्रिपुराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. राज्यातील लोकांमध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केल्याचे देब म्हणाले. संघटन मजबूत असेल तेव्हाच सरकार स्थापन होऊ शकते असेही ते म्हणाले.
भाजपने बोलावली होती बैठक
बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सायंकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी माणिक साहा यांच्या नावासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली.