Mangolpuri murder case : दिल्लीच्या मंगोलपुरीमधील रिंकू शर्मा (Rinku Sharma Murder case) हत्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय आणि धार्मिक अॅंगल असल्याच्या शक्यतेला पोलिसांनी फेटाळलं आहे. हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत नसीरूद्दीन, इस्लाम, जाहिद, मेहताब, ताजुद्दीन उर्फ ताजू यांना अटक केलं आहे.


मृत रिंकू शर्माच्या परिवाराने आरोप केला आहे की, जय श्रीरामचा जयघोष केल्यामुळं त्याची हत्या झाली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राम भक्त रिंकूचा काय दोष होता? असा सवाल केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी रिंकूच्या घरी जाऊन परिवाराची भेट घेतली आणि 5 लाखांची आर्थिक मदत केली तसेच दिल्ली सरकारकडून रिंकूच्या परिवाराला एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली.


भाजप नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या घटनेमागे मोठा कट आहे. रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. कंगना रनौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक व्हिडिओ रिट्वीट केला आहे. रिंकू शर्माच्या वडिलांचे दुःख जाणून घेतले पाहिजे, एका हिंदूची हत्या केली आहे, असे ती म्हणाली.


रिंकू शर्मा याची आई राधा शर्मा यांनी सांगितलं की, माझा मुलगा त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. तिकडून तो घरी आला. थोड्या वेळाने काही जणांनी माझ्या मुलाला फरफटत बाहेर नेले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. तक्रारीनुसार, दानिश हा इस्लाम, मेहताब आणि जाहीदसोबत बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरासमोरील गल्लीत आले. रिंकूच्या घराबाहेर येऊन ते शिवीगाळ करू लागले. मनु आणि त्याचा भाऊ रिंकू याने त्यांना हटकले. याचदरम्यान वाद वाढला. इस्लाम याने रिंकूचा गळा पकडला आणि त्याच्यावर हल्ला केला. मेहताब याने रिंकूवर चाकूने सपासप वार केले. मनु आणि रिंकूचा मित्रही धावून आला. त्याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. मनुने रिंकूला रुग्णालयात नेले. तेथे मनुला आणि त्याच्या मित्रालाही दाखल केले. उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला.