नवी दिल्ली : यवतमाळच्या नरभक्षक टी-वन वाघिणीची हत्या झाल्याचा आरोप अनेक प्राणीप्रेमींनी केला आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री आणि प्राणीप्रेमी असलेल्या मनेका गांधी यांनीही महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारच्या वनविभागाच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला.
वाघिणीच्या हत्येनं मी अत्यंत दु:खी आहे. हा सरळसरळ गुन्हा असून, वाघिणीच्या बचावासाठी अनेकांनी आवाहन करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट वाघिणीच्या हत्येचे आदेश दिले. वाघिणीच्या हत्येनं दोन निष्पाप बछड्यांना त्यांच्या आईच्या पश्चात मरणाच्या दारात नेऊन ठेवल्याचं मनेका गांधी म्हटलं.
आपण याबाबत कायदेशीर आणि राजकीय कारवाईबाबत विचार करत असल्याचंही मनेका गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. तसेच शिकारी शाफत अली हा गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत अनेक वन्य प्राण्यांना मारल्याचा आरोपही गांधी यांनी केला.
दरम्यान, दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला, असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.
अवनी वाघिणीच्या मृत्युची बातमी आली, त्या क्षणापासून वन्यजीवप्रेमींच्या विविध सामाजिक संघटनांकडून या प्रकियेबाबत संशय व्यक्त करणे सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारताना कुणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन करून ही वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत, तर वन्यजीव प्रेमिंकडून घेतलेले आक्षेप वन विभागाने फेटाळून लावले आहेत.