चेन्नई : चेन्नईतील एका इमारतीच्या गच्चीवरुन कुत्र्याला निर्दयीपणे खाली फेकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संतप्त प्राणीप्रेमींनी याची गंभीर दखल घेत, त्यांची ओळख पटल्यानंतर एफआयआर नोंदवला आहे.


 
एक तरुण कुत्र्याला उंच इमारतीच्या गच्चीवरुन खाली घनदाट झाडीत फेकत असल्याचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. त्या कुत्र्याचं पुढे काय झालं, हे व्हिडिओत समजू शकत नाही, मात्र व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

 

 

मंगळवारी हा तरुण म्हणजे चेन्नईतील एमबीबीएसचा विद्यार्थी असल्याची ओळख पटली आणि प्राणीप्रेमी व्यक्तींनी त्याच्याविरोधात कडक पावलं उचलण्यासाठी एफआयआर नोंदवला. कुत्र्याला फेकणाऱ्या तरुणाचं नाव गौतम सुदर्शन असून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचं नाव आशिष पॉल असल्याची माहिती आहे. दोघंही चेन्नईतील माधा कॉलेजमध्ये मेडिकलच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत असल्याचं समोर आलंय.

 

 

प्राणीप्रेमींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ते भाड्यावर राहत असलेल्या खोलीच्या दिशेने कूच केलं. मात्र याची कुणकुण लागल्यामुळे दोघंही जण फरार झाले. इतकंच नाही तर या नीच व्यक्तींना कॉलेजमधून निलंबित करा, अशी मागणी आपण करणार असल्याचंही तक्रारकर्त्याने म्हटलं आहे.

 
या कृत्यासाठी दोघांना कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी हा व्हिडिओ काढण्यात आला असून संबंधित कुत्र्याविषयीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

 

पाहा व्हिडिओ :