बरेली (उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका व्यक्तीनं अनैतिक संबंधात आड येणाऱ्या आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह नदीत फेकून दिला तर आपल्या दीड वर्षाच्या मुलाला एका साधूकडे सोपावलं.


पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधकटा गावातील अप्सरा नदीच्या पुलाखाली काल एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यानंतर तिची ओळख पटविण्यात आली. बेगम गावातील मोहनलाल याची ती पत्नी होती. तिचं वय 23 वर्ष असून ती गेल्या दिवसांपासून बेपत्ता होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, मोहनलाल आठ ऑक्टोबर रोजी आपली पत्नी पूनम आणि दीड वर्षाचा मुलगा गौरव यांना पूनमच्या माहेरी सोडायला गेला होता. तेव्हापासून हे तिघेही बेपत्ता झाले होते. त्यानंतर मोहनलालच्या भावानं तिघं हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

11 ऑक्टोबरला मोहनलाल पोलिसांना जवळच्या जंगलात नशेमध्ये आढळून आला होता. त्याची चौकशी करुन पोलिसांनी त्याला सोडून दिलं होतं. पण पूनमच्या माहेरच्या मंडळींनी तिची आणि मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्याआधारेच पोलिसांनी मोहनलालला ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, चौकशीअंती मोहनलालनं आपणच पत्नीची हत्या केल्याचं मान्य केलं. आपल्याच कुटुंबातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं त्यानं मान्य केलं. त्यामुळे यावरुन पूनम आणि त्याच्यात वारंवार भांडणंही होत असे.

मोहनलालनं पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने तिची हत्या केली आणि मुलाला एका साधूच्या हाती सोपावलं. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.