अलाहाबाद : उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये किरकोळ भांडण कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचं कारण बनलं. वादानंतर एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर तिन्ही मुलींना मारुन स्वत:ही गळफास घेतला. मनोज कुशवाह असं या व्यक्तीचं नाव आहे.

पत्नीला मारल्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. एका मुलीचा मृतदेह बॉक्समध्ये ठेवला, तर दुसऱ्या मुलींचा मृतदेह कपाटात लपवून ठेवला आणि तिसऱ्या मुलीला मारुन जमिनीवरच ठेवलं. यानंतर त्याने पंख्याला लटकून गळफास घेतला.

सकाळी दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले.

संपूर्ण घटना काय?
अलाहाबादच्या धूमनगंज परिसरातील पीपल गावमध्ये मनोज कुशवाह आपली पत्नी श्वेतासह राहत होता. या धक्कादायक घटनेआधी पती-पत्नीमध्ये भांडण झालं. यानंतर पतीने पत्नी श्वेतासह सगळ्या मुलींना मारुन आत्महत्या केली.

पत्नी श्वेता, प्रिती (मुलगी, वय 8 वर्ष), श्रेया (मुलगी, वय 3 वर्ष) आणि शिवानी (मुलगी, वय 6 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. पाच जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर घराबाहेर प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हत्या आणि आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद झाला होता, तो वाद चौघींची हत्या आणि आत्महत्यापर्यंत पोहोचला, असं म्हटलं जात आहे.

पोलिसांचं पथक घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहे. तर परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर ही हत्या आणि आत्महत्या आहे की, बाहेरच्या कोणा व्यक्तीचा या घटनेत हात आहे, हे स्पष्ट होईल.