पत्नीशी अनैतिक संबंध, डोक्यात रॉड टाकून लहान भावाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2016 03:38 PM (IST)
नवी दिल्ली: पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून स्वत:च्याच छोट्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नजफगढमध्ये घडली आहे. 25 वर्षीय प्रमोद कुमारनं आपल्या 23 वर्षीय भावाची लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करुन हत्या केली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी प्रमोदला घटनास्थळावरुन अटक केली. पोलिसांना याप्रकरणी प्रमोदचा कबुली जबाबही नोंदवला. प्रमोदला पहाटे तीन वाजता अचानक जाग आली. त्यावेळी त्याला त्याची पत्नी आपल्या रुममध्ये दिसली नाही. त्यानं तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला सापडली नाही. त्यानंतर प्रमोदनं आपला लहान भाऊ राकेशच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण बराच वेळ झाला तरी आतून काहीही उत्तर त्याला मिळालं नाही. त्यानंतर त्याला शंका आली की, बहुदा त्याची पत्नी आत आहे. त्यानंतर त्यानं जोरजोरात दरवाजा ठोकला. अखेर बऱ्याच वेळानं राकेशनं दरवाजा उघडला. त्यावेळी त्याची पत्नी त्याला आत दिसली. यानंतर प्रमोदचा संयम ढळला आणि त्यानं थेट राकेशच्या डोक्यात लोखंडी रॉडनं प्रहार करण्यास सुरुवात केली. राकेशला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रमोदला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.