सवतीसाठी संपूर्ण कुटुंबालाच संपवलं
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 12:10 PM (IST)
लखनऊ: काही दिवसांपूर्वी ठाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली होती. एका तरुणाने शेअर बाजारातील नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबीयांना संपवले होते. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. पण या घटनेतील प्रमुख आरोपीला सवत आणायची होती, पण त्याला पहिल्या पत्नीकडून परवानगी न मिळाल्याने त्याने पत्नीसह आपल्या तीन मुलांची हत्या केली. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये बरेलीच्या तिहरा गांवात ही घटना घडली. सुच्चा सिंह असे या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या विवाहाला परवानगी मिळावी, यासाठी तो आपल्या पत्नीसोबत सतत भांडत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुच्चाचे आपली पत्नी जसप्रीतसोबत याच विषयावरून कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्याभरात त्याने तलावारीने आपल्या पत्नीसोबत 14 आणि 10 वर्षीय मुलांचा आणि 12 वर्षांच्या मुलीची हत्या केली. या हत्याकांडानंतर तो बाईकने पळून जात असताना, जवळच्याच शेतातील तारेच्या कुंपणात आडकून त्याचाही मृत्यू झाला. सुच्चा सिंह याच्या कुटुंबातील केवळ त्याची आईच या घटनेत वाचू शकली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुच्चाला सुंदर तरुणीसोबत विवाह करायचा होता. यासाठी तो आपल्या पहिल्या पत्नीशी सदैव वाद घालत असे.