कोपर्डी बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.
मराठा मोर्चाचं स्वागत, दलितांचे प्रतिमोर्चे नकोत
ते म्हणाले, "मराठा मोर्चा त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करतोय, याचं मी स्वागत करतो. मराठा मोर्चा दलितविरोधी हा संघाकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीच आरोपींना पकडून दिलं. मात्र संघाने याप्रकरणी राजकारण सुरु केलं असून काही लोकांना हाताशी धरुन प्रतिमोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. असे मोर्चे निघू नयेत या मताचा मी आहे. तसेच जे मोर्चे काढतील, ते संघ आणि भाजपच्या हातातील बाहुले झालेले असतील", असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
सरकराने सहकारातल्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याची धग अनेकांना जाणवू लागली आहे. १५९ कुटुंबांच्या हातात सगळा सहकार आहे. इतर मराठ्यांना त्यात येण्याची मुभा नाही.
सहकार क्षेत्रातल्या चौकशा, कारवाया हे मराठा मोर्चाचं कारण असावं. गरीब मराठ्यांनी या सहकार नेत्यांच्या मागे किती जायचं हे ठरवावं, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
सहकार क्षेत्रात एवढा भ्रष्टाचार झाला नसता, तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळच आली नसती, हे गरीब मराठ्यांनी लक्षात घ्यावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.