जयपूर : हेडफोन किंवा इअरफोन वापरणाऱ्यांसाठी सावधान करणारी बातमी आहे. तुम्ही कॉल करण्यासाठी किंवा म्युझिक ऐकण्यासाठी हेडफोन किंवा ब्लूटूथ इयरफोन वापरत असाल तर तुम्हालाही सतर्क राहण्याची गरज आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये चार्ज करताना ब्लूटूथ हेडफोनमध्ये स्फोट झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटनाी समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, अपघातात बळी पडलेला 28 वर्षीय तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. चौमु शहरातील उदयपुरिया गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर त्या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


राकेश कुमार नागर ब्लूटूथ हेडफोन्स कानाला लावून घरात बसला होता, मात्र त्याचवेळी हेडफोन चार्जिंग प्लगशी जोडले होते. गोविंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक हेडफोनमध्ये स्फोट झाला आणि तरुण बेशुद्ध झाला. अपघातानंतर तरुणाला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृतदेह युवकाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.


स्मार्टफोन चार्जिंग करताना 'ही' काळजी घ्या; बॅटरी लाईफ वाढण्यास होईल मदत


सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ. एल. एन. रुंडला म्हणाले की, तरुणाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, राकेश कुमारचे लग्न यावर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते. घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की राकेश अभ्यासात हुशार होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.


SmartWatch side Effects : स्मार्टवॉचने आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात?


मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज किंवा इलेक्ट्रिक उपकरणे यांचा आपल्याला फार उपयोग होतो. मात्र या वस्तू वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, काही नियम आहेत. मात्र अनेकता आपण या वस्तू चुकीच्या पद्धतीने हाताळतो, त्यामुळे असे अपघात घडतात. चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरल्याने स्फोट झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या हेत. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत जेणेकरुन असे अपघात होणार नाहीत.