76 फूट क्रेनवर चढून सिगरेटसाठी राडा, सिगरेट कशीबशी वर पाठवल्यावर तरुण म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2018 09:39 AM (IST)
जमलेल्या लोकांनी त्याला कशीतरी सिगरेट पाठवली. मात्र जीव देण्याची धमकी देणाऱ्या या राजूने ती सिगरेट नको मला महागडी, ब्रँडेड सिगरेट हवी, असं म्हणत ती परत खाली पाठवली.
नवी दिल्ली: नशा किंवा व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र नशेबाजीसाठी काही लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. दिल्लीतील पहाडगंज भागात महागड्या सिगरेटसाठी एक जण चक्क 76 फूट उंच क्रेनवर चढला. राजू असं या तरुणाचं नाव आहे. सिगरेट न दिल्यास वरुन उडी घेत आत्महत्या करण्याची धमकी राजू देत होता. दिल्लीत रात्री 9 च्या सुमारास राजू हे सगळं नाटक करत होता. तब्बल 76 फूट उंच क्रेनवर चढून तरुण धमकी देत असल्याने, अनेक जण घाबरले. त्याला खाली उतरण्यासाठी समजावू लागले. मात्र राजूने सिगरेटचा हट्ट कायम ठेवला. मग जमलेल्या लोकांनी त्याला कशीतरी सिगरेट पाठवली. मात्र जीव देण्याची धमकी देणाऱ्या या राजूने ती सिगरेट नको मला महागडी, ब्रँडेड सिगरेट हवी, असं म्हणत ती परत खाली पाठवली. हा तमाशा थांबवण्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर दुसऱ्या एका व्यक्तीला पाठवण्यात आलं. मात्र हट्टी राजू त्याचं नाटक काही बंद करत नव्हता. जोपर्यंत सिगरेट मिळणार नाही, तोपर्यंत उतरणार नाहीच. शिवाय वरुन उडी मारुन जीव देऊ, अशी धमकी तो देत होता. रात्रभर हा तमाशा सुरु होता. अखेर जवळपास 9 तासानंतर सकाळी 6 च्या सुमारास अग्निशमन दलाने राजूवर ताबा मिळवत, त्याला पकडून खाली आणलं.