मुंबई : चीन आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या ट्रेड वॉरमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण, अमेरिकेतून येणाऱ्या सामानावर चीनने आयातकर वाढवला तर अमेरिकेला कच्च्या तेलाच्या किमती कमी कराव्या लागतील.

‘अमेरिकेतील कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्याने आपल्याकडून केली जाणारी आयात वाढली आहे. जर चीनने अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात कमी केली तर अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती अजून कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत भारत अमेरिकेतून जास्त प्रमाणात तेल आयात करु शकतो,’ असं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अधिकारी ए.के. शर्मा यांनी म्हटलं आहे.

जुलैअखेरपर्यंत अमेरिका 15 मिलिअन बॅरल क्रूड ऑईल भारतात पाठवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून भारतात 2017 साली अवघे आठ मिलिअन बॅरल एवढेच कच्चे तेल आयात झाले होते.

दरम्यान, इराणवर प्रतिबंध लागू करण्याआधी अमेरिकेतून भारताने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली. आशियाई देशांनी तेलाच्या पूर्ततेसाठी इराण आणि व्हेनेझुएलाच्या ऐवजी अमेरिकेचा पर्याय निवडला आहे.