नवी दिल्ली : चिकटपट्टीच्या मदतीने शरीरावर 20 लाखांची रोकड लपवून नेणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हीरल कुमार पटेल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

 

हीरल कुमार पटेल बुधवारी कानपूरहून नवी दिल्लीला येत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पैसे चोरी होऊ नये यासाठी शरीरावर पैसे चिटकवल्याचा दावा हीरलने केला आहे.

 

हीरल काळा पैसा अवैधरित्या ट्रान्सफर करण्याचं काम करतो, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पोलिसांनी हीरलसह त्याच्या सहकाऱ्यालाही अटक केली आहे. हीरल हे 20 लाख रुपये त्यालाच देणार होता.

 

तिकीट निरीक्षकाने हीरल पटेलला पकडलं. शताब्दी एक्स्प्रेस नवी दिल्लीच्या स्टेशनवर थांबण्याआधी हीरलने ट्रेनमधून उडी मारली. त्याला पकडण्यासाठी निरीक्षकानेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर टीटीईने हीरलला पाहिलं. त्याने हीरलकडे तिकीट दाखवण्यास सांगितलं. परंतु हीरलकडे तिकीट नसल्याने त्याने पळ काढला. मात्र  स्टेशनबाहेर जाण्याच त्याने हीरलला पकडलं.

 

यानंतर हीरलची झाडाझडती केली. त्यावेळी हीरलने त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी चिकटपट्टी लावली होती. त्या चिकटपट्टीखाली रोकड लपवली होती.

 

हीरलच्या माहितीनुसार, तो कानपूरमध्ये एका कारखान्यात काम करतो आणि मालकाने दिलेले पैसे नवी दिल्लीतील एका व्यक्तीला देण्यासाठी आला होता.

 

दरम्यान, पोलिस आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.