कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुक निकालानंतर 30 मे ला पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. "मी इतर मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. ते देखील या शपथविधीला जाणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने मी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे", असे ममता यांनी म्हटले आहे.


लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनाही झाल्या. त्यावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर 'फनी वादळ' धडकलं त्यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत विचारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या फोनला ममतांनी प्रतिसाद दिला नव्हता. या सगळ्या घटनांनंतर ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीला जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.



नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याबाबत अनेक अंदाज लावले जात असताना ममता यांनी मात्र त्या उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममता बॅनर्जींना झटका, दोन आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश