कोलकाता : एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ डॉक्टरांवर जमावाने हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला देशभरातील असंख्य डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवत डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना आंदोलन थांबवण्यास सांगितले होते. ममता यांनी डॉक्टरांना तसा अल्टीमेटम दिला होता. परंतु ममतांच्या अल्टीमेटमला न जुमानता डॉक्टरांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांचा भाचा आबेश बॅनर्जी याने आंदोलक डॉक्टरांचे समर्थन केले आहे. आंदोलक डॉक्टरांनी आज केपीसी वैद्यकीय महाविद्यालय ते एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयादरम्यान मोर्चा काढला. ममतांच्या भाच्याने (आबेश) या मोर्चाचे नेतृत्व केले. (आबेश हा ममतांचा भाऊ कार्तिक बॅनर्जी यांचा मुलगा आहे.)

आबेश स्वतः केपीसी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. कनिष्ठ डॉक्टरांनी ममता यांच्याविरोधात काढलेल्या मोर्चात आबेश सहभागी झाल्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे.

सोमवारी नील रतन सिराकर मेडिकल कॉलेजमध्ये(एनआरएसएससी) उपचारादरम्यान एका 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या जमावासह रुग्णालयात घुसून कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील निवासी तसेच कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन उभारले आहे.

हे आंदोलन चिघळण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्यासाठी 4 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आंदोलन मागे न घेतल्यास जबरदस्त अॅक्शन घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळेच हे आंदोलन चिघळल्याचे बोलले जात आहे.

पाहा व्हिडीओ



दरम्यान कोलकात्याचे महापौर फरहाद हकीम यांची मुलगी शभा हकीम हिनेदेखील या आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. डॉक्टरांच्या आंदोलनाबाबतची सरकारची भूमिका चुकीची असल्याचे शभाने म्हटले आहे.


ममतांच्या अल्टीमेटमनंतरही चौथ्या दिवशी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच, देशभरात पडसाद