Cyclone Sitrang Updates : बांगलादेशात 'सितरंग' (Sitrang) चक्रीवादळामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'सितरंग' बांगलादेशच्या किनारपट्टीकडे जाण्यापूर्वी तिथल्या हजारो लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवावे लागले होते. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, देशभरात जवळपास काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दक्षिणेकडील आणि नैऋत्य बांगलादेशच्या किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी साचले होते. 'सितरंग' चक्रीवादळामुळे किमान 35 लोकांचा मृत्यू झाला असून बांगलादेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टी आणि मध्य भागात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मंगळवारी अधिकारी आणि मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली.


बांगलादेशात चक्रीवादळामुळे 35 जणांचा मृत्यू 
मंगळवारी दुपारनंतर चक्रीवादळाचा जोर कमी झाला. राजधानी ढाका येथील हवामान विभागाने सोमवारी संध्याकाळी 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची नोंद केली होती. हा धोका मंगळवारी कमी झाल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. बरगुना, नरेल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यात अनेक लोक ठार झाले, एएफपीने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने माहिती दिली.


चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस
सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एका घरावर झाड पडल्याने एक जोडपे आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. भोला जिल्ह्यात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. नरेल आणि बरगुना उपजिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. चितगाव जिल्ह्यातून एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. सिराजगंज जिल्ह्यातील जमुना नदीत वादळादरम्यान बोट उलटून आई आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ढाका येथे एका इमारतीचे रेलिंग कोसळून एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी गोपालगंज जिल्ह्यात झाड पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. पटुआखली येथील वादळात बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह सापडला आहे. मुन्शीगंज जिल्ह्यात घरावर झाड पडल्याने आई आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.


10 हजार घरांचे नुकसान


आपत्ती व्यवस्थापन आणि मदत राज्यमंत्री इनामुर रहमान यांनी मंगळवारी ढाका येथे सांगितले की, चक्रीवादळामुळे बांगलादेशातील सुमारे 10,000 घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 6,000 हेक्टर शेतजमीन आणि 1,000 कोळंबी फार्मचेही नुकसान झाले आहे. आम्ही 6,925 चक्रीवादळ आश्रयस्थानांमध्ये 10 लाख लोकांना आश्रय देण्यास सक्षम आहोत.


100 किमी वेगाने किनारपट्टीवर धडकले वादळ 
कोलकाता येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले की, सोमवारी रात्री 9.30 ते 11.30 दरम्यान सीतारंग वादळ बांगलादेशातील टिनाकोना बेट आणि बारिसालजवळील समुद्रात 80 ते 90 किमी प्रतितास ते 100 किमी प्रतितास वेगाने वाहत होते. बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चक्रीवादळामुळे आग्नेय भागात जोरदार पाऊस झाला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची अपेक्षा आयएमडीने वर्तविली होती.


 






 


आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला
सोमवारी अधूनमधून पडणाऱ्या पावसाने लोकांना घरातच राहण्यास भाग पाडले आणि दिवाळीच्या संध्याकाळी कोलकातामधील बहुतेक रस्ते निर्मनुष्य होते, कारण या दिवशी हजारो लोक दिवाळीच्या दिवशी काली पूजेच्या मंडपांना भेट देतात. पश्चिम बंगाल सरकारने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता.