Mallikarjun Kharge Attack On PM Modi: नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी नरेंद्र मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मोदींनी जवाहरलाल नेहरुंची बरोबरी केली आहे. अशातच नरेंद्र मोदींच्या शपथविधीवरुन काँग्रेसनंत्यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे मंत्री शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय, ज्यात 10 भारतीयांना प्राण गमवावे लागलेत, असं म्हणत काँग्रेसनं नरेंद्र मोदींसह संपूर्ण एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट केलं आहे. 


मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "किमान 10 भारतीयांनी आपले प्राण गमावले आहेत. आमच्या लोकांवर झालेल्या या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आम्ही निर्विवादपणे निषेध करतो."






मोदींचा दहशतवादाविरोधातील प्रचार पोकळ : मल्लिकार्जुन खर्गे 


मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले आहेत की, "आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी इच्छा व्यक्त करतो. सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी पीडितांना तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई द्यावी. तीन आठवड्यांपूर्वीच पहलगाममध्ये पर्यटक आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार आणि अनेक दहशतवादी घटना सुरू आहेत, शांतता आणि सामान्य स्थिती आणण्याचा सर्व प्रचार पोकळ ठरत आहे. भारत दहशतवादी हल्ल्याप्रति एकजुट आहे." 


कधी आणि केव्हा झालाय दहशतवादी हल्ला? 


जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात बस दरीत कोसळल्यानं 10 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला. बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथे परतत असताना दहशतवाद्यांनी यात्रेकरुंच्या बसवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर बस दरीत कोसळली. त्यावेळी बसमध्ये तब्बल 50 प्रवासी प्रवास करत होते. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात केला होता. शिवखोडी मंदिरातून कटरा येथे परतणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अशा परिस्थितीत चालकाचा तोल गेल्यानं बस खड्ड्यात पडली. दरम्यान, बचावकार्य पूर्ण झालं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, जिथे भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला, तो परिसर रेसाई आणि राजौरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या परिसरात यापूर्वी दहशतवाद्यांचा वावर दिसून आला आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली आहे.