Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीका केली आहे. 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले जम्मूमध्येही होऊ लागले आहेत, मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
'एकीकडे शपथविधी दुसरीकडे दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ'
संजय राऊत यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडायच्या. मोदी सरकार इतकं बलवान ठरलं की, 370 हटवल्यानंतर जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले होऊ लागले, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. आजही जम्मूतच एक हल्ला झाला, ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते. आजही काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत. मोदीजी, पंडित घरी कधी परतणार? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.
10 जणांचा मृत्यू, 33 जखमी
दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार केला. रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत 10 जण ठार झाले असून 33 जण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर शिव खोडी मंदिराकडून कटराकडे जाणारी प्रवासी बस खोल दरीत पडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ रविवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना घडली.
राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर ट्वीट करताना लिहिलं आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी आहे. या भ्याड हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हे दुःखद आणि लज्जास्पद आहे. काँग्रेस परिवार शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना.