नवी दिल्ली : काँग्रेस पक्षांतर्गत अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या 20 पेक्षा अधिक वर्षांहून खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोतीलाल व्होरा नव्वदीत पोहचल्याने काँग्रेसच्या तिजोरीची चावी आता अहमद पटेलांकडे देण्यात आली आहे. सोनिया गांधींचे राजकीय सचिव म्हणून काम पाहणाऱ्या पटेलांना राहुलयुगातही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याआधी काँग्रेसचे खजिनदार असलेल्या मोतीलाल व्होरा यांना आता काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन) करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अहमद पटेल यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे याच दिवशी मोठं पद देऊन काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकप्रकारे अहमद पटेल यांना मोठं गिफ्ट दिले आहे.

याआधीही अहमद पटेल यांनी खजिनदार म्हणून काम केलं आहे. 1997 मध्ये सीताराम केसरी यांच्यानंतर ते खजिनदार होते.

काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉ. करण सिंग यांच्याकडून काढून घेण्यात आले असून, हे पद आता आनंद शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच, ईशान्य भारताचे काँग्रेस सरचिटणीस आणि इनचार्ज डॉ. सी. पी. जोशी यांच्याकडील पदभार काढून, त्यांच्या जागी लुईझिन्हो फ्लेरिओ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या कायमस्वरुपी निमंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी या नव्या नियुक्त्यांबाबत परिपत्रक काढले असून, नव्या नियुक्त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.