नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चौकीदार म्हटलं आहे. मात्र यावेळी मोदींनी देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. चौकीदार देशाची सेवा करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी मेहनत करतात ते सगळे चौकीदार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी एकटा चौकीदार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी कठीण परिश्रम करतात ते सगळे चौकीदार आहेत.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आज देशाचा प्रत्येक नागरिक 'मी पण चौकीदार' असल्याचं बोलत आहे. यासाठी मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा वापर केला आहे. आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडीओत देशातील विविध राज्यातील लोकांना दाखवण्यात आलं आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे.  भ्रष्टाचार विरोधी लढाई सुरुच राहणार असून यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक आपल्यासोबत असल्याचं मोदींनी म्हटलं.

राफेल घोटाळ्यावरुन विरोधक आणि खासकरुन राहुल गांधी नरेंद्र मोदींवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. राहुल गांधी 'चौकीदार ही चोर है' असं म्हणत मोदीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी भाजपने ही अनोखी शक्कल लढवल्याचं बोललं जात आहे.