पणजी : गोव्यात भाजपविरोधात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पणजी येथील आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

महाराष्ट्रात भाजपसोबत युती असली तरी शिवसेना गोव्यात भाजपविरोधात दोन्ही निवडणुका लढवणार. शिवसेनेच्यावतीने उत्तर गोव्यातून राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उप राज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई नाईक निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, असं राऊत म्हणाले.

मागील विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी गोवा सुरक्षा मंचने तिन्ही पोटनिवडणुकांचे उमेदवार जाहीर केले आहेत.असे असले तरीआज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.