मुंबई : समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियाच्या विश्वात सक्रिय असणाऱ्यांची संख्या मांडणंही आता कठीण झालं आहे. अशा या वैविध्यपूर्ण विश्वात सक्रिय असणाऱ्यांच्या यादीतील एक ओळखीचं नाव म्हणजे आनंद महिंद्रा. mahindra group  महिंद्रा एँड महिंद्रा समुहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच या माध्यमाप्रती कुतूहल व्यक्त केलं आहे. अशा या माध्यमाच्या सहाय्यानं ते कायमच विविध क्षेत्रातील नवोदितांचं स्वागत करत असतात. त्यांची कौशल्य जगासमोर आणत असतात.


असाच एक अफलतून चिमुरडा सध्या त्यांचं लक्ष वेधून गेला आहे. परिणामी महिंद्रा यांनी त्याच्याबाबत सर्वांनाच माहिती देत त्याचं कौशल्य पाहून आपण भारावल्याची भावना व्यक्त केली आहे. हा लहान मुलगा सध्याच्या घडीला जगातील सर्वात वेगवान लहान मुलगा ठरत आहे.


अवघ्या 8 वर्षांच्या वयात या मुलानं साऱ्या विश्वाचं लक्ष वेधलं आहे. त्याचं कौतुक करताना महिंद्रा लिहितात, ‘हा जणू एका यंत्राप्रमाणंच आहे. तो धावतो तेव्हा पायही धुसर (काहीसे दिसेनासे) होतात. तो जगातील सर्वात वेगवान पुरुष ठरेल यात शंकाच नाही.’


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील या मुलाबाबत कुतूहल व्यक्त करतच त्यांनी आपल्या देशातही अशाच प्रकारचं कौशल्य आणि किमया करणारं कोणीतरी असेलच, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. किंबहुना कोणीतरी नक्कीच त्यांच्या परिनं एखाद्या संधीच्या प्रतीक्षेत असेल अशी आशा व्यक्त करत त्यांनी सर्वांनाच आपल्या मोबाईलवर लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे.


मागील कित्येक वर्षांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी प्रगती आणि त्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात येणारे कित्येक चेहरे, त्यांच्या जीवनात झालेले अमूलाग्र बदल हे याचीच प्रचिती देतात.





व्हायरल व्हिडिओतील हा मुलगा आहे तरी कोण?


सर्वच माध्यमातून व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील मुलाचं नाव Rudolph Blaze ingram असल्याचं कळत आहे. सर्वच प्रश्नांची उत्तर  देण्यासाठी म्हणून मदतीस येणाऱ्या Google वर Fastest kid म्हणून सर्च केलं असता मिळणारं उत्तरच सर्वकाही सांगून जातं. Rudolph हा अवघ्या 8 वर्षांचा आहे. वेग हीच त्याची ओळख आहे. 2019 या वर्षात या मुलानं 8.69 सेकंदांमध्ये 60 मीटर धावण्याची किमया केली होती. इतकंच नव्हे, तर त्यानं 13.48 सेकंदांमध्ये 100 मीटर अंतर धावत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.





जगातील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू उसेन बोल्ट याच्यापासून तो अवघे 4 सेकंद मागे राहिला होता. Rudolphचा वेग पाहता आता पुढं जाऊन तोसुद्धा क्रीडा जगतात नावलौकिक मिळवेल अशीच अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे. एकिकडे Rudolphची चर्चा सुरु असतानाच इथं आनंद महिंद्रा यांनी भारतातही अशा प्रकारचे गुण असणारं कोणीतरी दडलं असेलच, असं म्हणत उपस्थित केलेल्या कुतूहलपूर्ण प्रश्नावर आता कोणत्या स्वरुपात उत्तरं मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाय असं कोणी खरंच सापडतं का, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.